विदर्भातील नविन ७ महाविद्यालयांचा समावेश
जा.न्यूज़ प्रतिनिधि
अकोला। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय चिकित्सा पद़धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली (एनसीआयएसएम) यांनी देशभरात नविन ३१ आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता दिली असून त्यापैकी २० महाविद्यालये महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये विदर्भातील ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. बीएएमएस या आयुर्वेदाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेची चौथी फेरी उद्या दि. २७ नोव्हेंबर पासुन सुरू होत आहे. एनसीआयएसएम ने प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत १ डिसेंबर जाहीर केली असल्याने त्यापुर्वी प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्याचा प्रयत्न सीईटी सेलने केला आहे.
यावर्षी विदर्भात मान्यता मिळालेल्या आयुर्वेद महाविद्यालयात अकोला व नागपूर जिल्हयातील २ महाविद्यालये, शेगांव, कारंजा लाड व गोंदीया येथील प्रत्येकी १ महाविद्यालय अशा एकूण ७ महाविद्यालयांचा समावेश आहे.
यावर्षी राज्यात मान्यता मिळालेल्या आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये बहुतांश महाविद्यालये राजकीय नेत्यांची असुन त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मुक्ताई नगर येथे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लोणी येथे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे अकलुज येथे, माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे इचलकरंजी येथे, माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या कन्या किर्ती गवई यांचे कारंजा लाड येथे, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड येथे, आमदार किशोर दराडे यांचे येवला येथे, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचे सांगुलवाडी (सिंधुदुर्ग) येथे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांचे हातनूर औरंगाबाद येथे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांचे बाभुळगांव अकोला येथील आयुर्वेद महाविद्यालयास शासनाने मान्यता दिली आहे. गतवर्षी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता मिळाली होती.
२७ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना पर्याय प्राधान्यक्रम भरता येईल. दि.२८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधीत महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येईल. तिसर्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनाही चौथ्या फेरीत अर्ज करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या व आपल्या गावानजीकच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
