कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
कृषी क्षेत्रातील आव्हानांवर एआय ठरणार गेमचेंजर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
एआय फॉर ॲग्री २०२६ परिषदेचे उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण
जा.न्यूज़ संवाददाता
मुंबई। शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआयला राष्ट्रीय विकासासाठी महत्वाचे स्थान दिले आहे. इंडिया एआय मिशनचा उद्देश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समावेशकता, पारदर्शकता आणि व्यापक परिणामकारकता आहे. शेती हे प्रत्येक घराशी व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असलेले क्षेत्र आहे. कृषी क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य एआय क्रांतीत आघाडीवर राहिल. सर्वसमावेशक एआय कृषी धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
शेतकऱ्यांसाठी महा-विस्तार एआय हा डिजिटल साथीदार विकसित करण्यात आला आहे. याच्या सहाय्याने शेती विषयक सल्ला, हवामान व कीड व्यवस्थापनाविषयी माहिती, बाजार भावाचे संकेत आदींसह शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेशही मिळणार आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांपर्यंत हे ॲप पोहचले असून नोंदणीमध्ये वाढ होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले।
*****
